मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यातच आता शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मनसेसोबत (MNS) युती करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नमूद केले.
माझ्या मतानुसार मनसेसोबत युती करण्यास कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षांचा मुख्य अजेंडा आणि बेस हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असं शहाजीबापू म्हणालेत. मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांमध्ये होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यावर विचारलं असता, बरेच राजकीय विश्लेषक, जाणकार मंडळी येऊन भेटतात.
तसेच त्यांचे म्हणणे आहे की, १९९५साली आमदार असलेले काही मोजके नेते आहेत. त्यामुळे तुम्ही ज्येष्ठ राजकीय नेते आहात. तुम्ही महाराष्ट्र फिरला आहात. तुम्हाला अनुभव आहे. तुमच्यासारख्या अनुभवी नेत्याला मंत्रिपद मिळायला हवे, असे मला सांगतात. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील जनतेला वाटतं. आपला आमदार मंत्री झाला पाहिजे, अशी अपेक्षा माझ्या मतदारसंघातील लोकांनाही आहे, असे शहाजी बापू म्हणाले.