बार्शी |
डॉ.विलास गुंड यांनी आपले पिता शिवाजीराव गुंड यांचा समृद्ध शैक्षणिक वारसा पुढे न्यावा. अशी अपेक्षा माजीमंत्री दिलीप सोपल यांनी व्यक्त केली. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. विलास गुंड यांच्या सेवापूर्ती समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाहाऊसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, ज्येष्ठनेते राजकुमार पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, शिक्षणतज्ञ प्रा.ए.डी.जाधव, प्रा.जयसिंगराव देशमुख, प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर, माजी नगरसेवक नागेश अक्कलकोटे, आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सोपल म्हणाले गुंड यांनी शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या पिताजींनी समाजसेवेचे साधन म्हणून शिक्षणसंस्था सुरू केली. या संस्थेची शैक्षणिक परंपरा चांगली आहे. हा वारसा पुढेनेत गुंड यांनी समाजकारण व राजकारणात ही सक्रिय व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मिरगणे यांनी गुंड घराण्याचा मोठा नावलौकिक आहे. बार्शीच्या विविध क्षेत्रात गुंड घराण्याचे काम आहे. बार्शीला कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा इतिहास आहे. कर्मवीरांपासून प्रेरणा घेत शिवाजीराव गुंड यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थेत सामान्य कुटुंबातील मुले घडली आहेत. डॉ.गुंड यांनी भावीकाळात चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
यावेळी सत्कारमूर्ति डॉ.गुंड यांनी आपण पुणे, कोल्हापूर, व मराठवाडा असे तीन विद्यापीठात काम केले. अनेक माणसे जोडली, विद्यार्थी प्रशिक्षित केले. आपल्या वाटचालीत अनेकांशी जोडलेले ऋणानुबंध कधीच विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले. राजा माने यांनी अध्यक्षीय समारोपात भरपूर मित्र असणारा आणि सर्वांशी हसत खेळत बोलून सर्वांच्या सुख-दु:खात सामील होणारा माणूस अशा शब्दात डॉ.गुंड यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी डॉ.गुंड व त्यांच्या पत्नी शीतल गुंड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. प्रा.किरण गाढवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रामराजे पवार, दत्ताअण्णा शिंदे, शशिकांत गव्हाणे, प्रा.चंद्रहंस गंभीर, सयाजीराव गायकवाड, रावसाहेब यादव, उमेश डोईफोडे, अमित इंगोले, मुरलीधर चव्हाण, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक वृंद तसेच विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.