सोलापुरकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बळ मिळो, ही श्री सिद्धरामेश्वरांकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली प्रार्थना
सोलापूर १६ ऑक्टोबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय बैठकांसाठी सोलापुरात आगमन केले. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते प्रथमच सोलापुरात दाखल झाले.
कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सायंकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, हुतात्मा मल्लाप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, ए. कुर्बान हुसेन आदी महापुरुष यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी श्री. नरेंद्र काळे, श्री. मोहन डांगरे, श्री. अनंत जाधव, श्री विक्रम देशमुख हे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय!
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आज सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील स्वीकारत आहे. ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी सोलापुरकरांचे ग्रामदैवत आणि श्रद्धास्थान श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेऊन मनोभावे पूजा केली. सोलापुरकरांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बळ मिळो, ही श्री सिद्धरामेश्वरांकडे त्यांनी प्रार्थना केली.
जिल्हाधिकारी यांच्याकडून पालकमंत्र्यांना पुस्तक भेट
शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री पाटील यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुस्तक भेट देऊन स्वागत केले. तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
लोकप्रतिनिधी व मान्यवर यांच्याकडून पालकमंत्र्यांचे स्वागत
आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख व आमदार समाधान आवताडे तसेच मान्यवर व्यक्तींनी पालकमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी यांची निवेदने स्वीकारली
शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांना दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले, त्या निवेदनावर संबंधित विभागाकडून तात्काळ कार्यवाही होऊन आपले काम मार्गी लागेल असे पाटील यांनी आश्वासित केले. त्याप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अन्य नागरिकांचे व पदाधिकाऱ्यांची निवेदने स्वीकारून त्यावर प्रशासनाकडून उचित कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.