Latest Marathi News

BREAKING NEWS

लोकशाहीतील काळे पर्व अर्थातच आणीबाणी, तब्बल १६ महिन्यांनी हे घरी परतले

0

बार्शी : देशात १९७५ ते १९७७ या काळात एकवीस महिन्यांसाठी तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. या काळात त्यांच्या विषयी समाजात रोष वाढत गेला, अनेकांनी आणीबाणीच्या काळात देखील याचा विरोध केला. वेळप्रसंगी जेलयात्रा देखील केली. असाच एक अनुभव रा. स्व. संघाचे महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ स्वयंसेवक अतुल दीक्षित यांनी लिहिला आहे. अतुल दीक्षित यांचे वडील कै. मुकुंदराव ( दादा ) दीक्षित यांचा आणीबाणी काळातील खडतर प्रवास आणि त्यासोबत घरच्यांना बघावा लागलेला त्रास, याचे वर्णन अतुल दीक्षित यांनी केले आहे. वाचा त्यांच्याच शब्दात.

लोकशाहीतील काळे पर्व अर्थातच आणीबाणी…

सुमारे 45 वर्षे झाली. आणीबाणी लागू झाली त्यावेळी मी अवघा 11 वर्षाचा होतो. फेब्रुवारी 1976 या महिन्यात (नक्की तारीख आठवत नाही) माझे वडील संघ स्वयंसेवक , पत्रकार कै. मुकुंदराव (दादा) दीक्षित यांना मिसा खाली अटक केली आहे ,असा निरोप घेऊन आमच्या दुकानातील माणूस मला घेण्यासाठी शाळेत आला. दुपारी दोन वाजता घरी आलो तर घरात पोलिस होते आणि आमच्या लोखंड गल्ली तील घराच्या बाहेर ओळखीच्या नागरिकांनी गर्दी केली होती. त्या एकाच दिवशी बार्शीतून तीन संघ स्वयंसेवकांना मिसा खाली अटक करण्यात आली होती त्यामध्ये माझे वडील ,कै. बिपीन नाईकवाडी, श्री. कृष्णाजी जिरांगकलगीकर होते. बार्शी शहरातून एकूण नऊ जण मिसाबंदी होते. आणि चार कार्यकर्ते यांनी आणीबाणी विरोधी सत्याग्रह केला होता.

मिसा बंदीची नावे – 1)कै. दादा दीक्षित 2)कै. आप्पाजी देवकर 3)कै. तात्यासाहेब देशमुख 4)कै. सुरेश संघवी 5) कै. बिपीन नाईकवाडी 6) श्री. सुरेश हालमे 7)कृष्णाजी जिरांककलगीकर 8) कै. अरविंदराव खेर 9)बाळासाहेब गौरकर
कै. रामभाऊ मोहोळकर , कै. बाबुराव पवार (पानगाव), कै. वीणाताई सुराणा आणि हरी मुळे यांना आणीबाणी विरोधात सत्याग्रह केल्यामुळे अटक करून 2 महिने बार्शी येथील कारागृहात बंदी केले होते.
अनेक भूमिगत कार्यकर्त्यांचा राबता आमच्या घरी होता. आणीबाणी विरोधी पत्रके वाटणे, समोरच्या माणसाचा अंदाज घेऊन उत्तरे देणे, धाडस हे गुण आणीबाणी कालखंडात शिकता आले. माणसे वाचायला आणीबाणी ने शिकवले. मिसाबंदीची मुले म्हणून समाजात एक प्रकारचा आदर असायचा पण तो व्यक्त करण्याचे धाडस फार थोड्या लोकांच्या मध्ये होते. मिसाबंदी च्या कुटुंबातील मंडळींना अनेक कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागत होते.

संघाच्या कामाच्या पद्धतीमध्ये एक नित्य स्वयंसेवक ,नैमित्येक स्वयंसेवक असे दोन प्रकार असायचे आणीबाणी नंतर संघर्षशील स्वयंसेवक हा तिसरा प्रकार अस्तित्वात आला.

त्याकाळात पोलिसांचा ससेमिरा मागे असायचा. आमच्या घरावर पोलीस नजर ठेवून असायचे त्यामुळे माणसं भेटायला यायला घाबरायची. माझे आजोबा कै. आत्मारामपंत दीक्षित हे त्यावेळी होते आणि त्यांचा मोठा मानसिक आधार होता.संघ परिवारात ते अंपा या नावाने ओळखले जायचे. कडवे हिंदुत्वनिष्ठ होते. गांधी हत्येनंतर त्यांना विसापूरच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते त्यांच्या बरोबर माझे वडील कै. दादा यांना सुद्धा अटक केली होती. त्यावेळी त्यांचे वय अवघे पंधरा वर्षांचे होते.त्यामुळे काँग्रेसी धोरणाची सवय झाली होती.

आणीबाणी मध्ये दादांना दुसऱ्यांदा अटक झाली होती ,नाशिक सेंट्रल जेल, नाशिक रोडला ते होते. आणीबाणीच्या कालखंडात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी कै. रंगा आण्णा वैद्य यांना बोलताना सांगितले की मुकुंदराव दीक्षित यांच्याकडून आणीबाणीचे समर्थन करणारा लेख लिहून प्रसिध्द करा,त्यांची सुटका करतो. पण प्रखर संघनिष्ठ दादांनी तो प्रस्ताव नाकारला हे वेगळं सांगायची गरज नाही.

आणीबाणीच्या काळात दै. तरुण भारत, दै. संचार या वृत्तपत्रांची एजन्सी आणि एक जर्सी गायीच्या दुधाचे उत्पन्न ही आमची उदरनिर्वाहाची साधने होती. ह्या सगळ्या कठीण प्रसंगाला तोंड देण्याचा आम्हाला सराव झाला होता. हे असताना 1977 ची लोकसभेची निवडणूक जाहीर झाली,प्रचाराची रणधुमाळी उठली त्यामध्ये आमच्या घरातील सर्वांनी भाग घेतला होता आणि रायबरेली मतदारसंघातून इंदिरा गांधींचा पराभव झाल्याची बातमी 22 मार्च 1977 ला रात्री अडीच वाजता आली. त्या रात्री 1000 कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली होती. मिरवणूक आमच्या घरापाशी आल्यावर आम्हा तिघा भावांना खांद्यावर उचलून आम्ही सगळ्यांनी मिळून जल्लोष केला होता. त्यावेळी मी एक घोषणा द्यायचो ‘आता कसं वाटतंय $$ लय गोड वाटतंय$$$….

25 मार्च 1977 ला नाशिक सेंट्रल जेल मधून हे सगळे मिसाबंदी सायंकाळी सहा वाजता बार्शी बस स्थानकात आले त्यावेळी त्यांचा स्वागतासाठी पाच हजार नागरिक आले होते. मोठी मिरवणूक काढली होती. मिरवणुकीचा समारोप पांडे चौकात झाला. तेथेच जाहीर सभेत दादांचे भाषण प्रचंड गाजले होते. सभा संपवून सगळ्यांना भेटुन रात्री दोन वाजता दादा घरी आले आणि 16 महिन्यानंतर वडिलांच्या बरोबर जेवणाचे भाग्य आम्हाला मिळाले. माझी आई कै. उज्वला दीक्षित हिने ह्या काळात खूप सोसलं होते. ती जेवताना रडायला लागली त्यावेळी कै.दादा तिला म्हणाले होते “आता पुरे..मी आलो आहे ना..” हे वाक्य आठवले तरी माझ्या अंगाची लाही लाही होते.

अनेक आठवणी आहेत पण शब्दमर्यादेमुळे सगळ्याच इथे लिहिता येत नाहीत. त्यासाठी ह्याच विषयावर एकत्रीकरण केले तर आणखी आठवणी सांगता येतील.
अतुल श्रीपाद दीक्षित,
बार्शी.

( लेखक अतुल दीक्षित, बार्शी. हे रा. स्व. संघाचे महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ स्वयंसेवक स्व. मुकुंदराव दादा दीक्षित यांचे चिरंजीव आहेत)
मो.9822653218

Leave A Reply

Your email address will not be published.