पुणे | पुण्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून वसंत मोरे यांचे खंदे समर्थक निलेश माझिरे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्मण सेनेला राम राम ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी निलेश माझिरे यांनी मनसेच्या माथाडी कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर माझिरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
मात्रसमोर आलेय माहितीवरून निलेश माझिरे यांनी बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे. आज सायंकाळी त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते, ते वसंत मोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे हेदेखील पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या.
मोरे हेदेखील मनसेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफरही दिली होती. मात्र मोरे यांनी मनसे सोडण्याच्या चर्चा फेटाळल्या आहेत. यावर आता मनसे नेते काय प्रतिक्रया देतायत हे पाहावे लागणारं आहे.