Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील : मुख्यमंत्री

0

मुंबई |

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील, अशी ठाम भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे मांडली.

केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना श्री. शिंदे म्हणाले, सीमाभागातील मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील. महाराष्ट्र शासन येथील जनतेसोबत खंबीरपणे उभे आहे. सीमावाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे आहे. जोपर्यंत यावर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय येत नाही तोपर्यंत केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करून या भागात शांतता राखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आजची बैठक सकारात्मक वातावरणात पार पडल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राकडून कायदा सुव्यवस्था राखली जात आहे : उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याकडून सीमावाद प्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याचे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काही ठराविक संघटना मुद्दाम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे श्री. फडणवीस यावेळी म्हणाले. अशा संघटनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी भूमिका केंद्र शासनाने मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राकडून आतापर्यंत कोणत्याही कायद्याचा भंग झालेला नाही. सीमाभागातील लोकांविरोधात खटले दाखल केले जातात. कधी मराठी शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला जातो. कधी मराठी भाषेचा विषय येतो. अशा विविध प्रश्नांवर मंत्र्यांची समिती अभ्यास करून मार्ग काढणार असल्याची माहिती, श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.