Latest Marathi News

BREAKING NEWS

“दुसऱ्या पक्षाचा म्हणून कधीच भेदभाव केला नाही”; अजित पवारांनी फेटाळले आरोप

0

 

मुंबई | सत्ताबदलानंतर विश्वासमत चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षातील अजित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक जुगलबंदी रंगली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनाचे भाषण करताना, सत्ता गमावलेल्या महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

तसेच मविआ सरकारच्या काळात घडलेल्या विविध घटनांवरून टोले लगावले. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच यावेळी बंडखोर आमदारांनी निधिबाबत सातत्याने केलेल्या टीकेचा समाचार घेत अजित पवार यांनी कोणला किती निधी दिला, याचा हिशोबच सभागृहासमोर मांडला.

महाविकास आघाडी होताना बऱ्याच गोष्टी घडल्या. खरे तर एकनाथ शिंदे यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी, असे ठरले आणि महविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून त्यांनी शिवसेनेच्या मदतीने आपला पक्ष वाढवला.
१९८० मध्ये भाजपचे १४ आमदार निवडून आले होते. यानंतर १६ झाले. १९९५ ला ४२ वरून भाजपच्या आमदारांची संख्या ६५ वर गेली.

तसेच १९९९ ला ५६ झाले. २००४ ला ५४ झाले. २००९ ला ४६ झाले आणि २०१४ रोजी चार पक्षांनी वेगवेगळ्या निवडणुका लढल्यानंतर १२२ आमदार भाजपचे निवडून आले. त्यानंतर २०१९ ला १०५ आमदार निवडून आले. याचाच अर्थ भाजपने शिवसेनेत राहून स्वतःची चांगली प्रगती केली. प्रत्येक जण आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो, असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.