पुणे: देशासह राज्यामध्ये कोरोनाचा विळखा वाढतो आहे. राज्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जवळपास १ लाख ३६ हजारांवर पोहचली आहे. मुंबई पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण हे पुण्यामध्ये आढळून आले आहेत. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले की, पुण्यातील रुग्णसंख्या पाहता कोरोना टेस्ट करण्याची व्यवस्था आणखी वाढवायला हवी अशी विनंती राज्य सरकारला आहे. शहरातील कोरोना प्रादुर्भावाचा दर गेल्या काही दिवसांत 18 टक्क्यांवर गेला आहे. मृत्यू रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे. प्रशासन चांगले काम करीत असले तरी खाजगी रूग्णालयाचा समन्वय यात प्रशासन अपयशी ठरले आहे. रूग्णांची आर्थिक लूट करण्यात येत आहे. एका कुटुंबातील दोघे-तिघांना उपचार घ्यावा लागला तर दिवाळे निघते आहे.
सध्याची वेळ ही टीका अथवा कोणाला कमी लेखण्याची नाही. मात्र, कुठे काही कमतरता राहत असेल तर ती निदर्शनास आणून देणे आपले कर्तव्य आहे. संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात आहेत. त्यातून रूग्ण ओळखतो येतो आणि इतरांना सावध करता येतं. हाच सर्वोत्तम मार्ग आहे आणि तो जगाने स्वीकारला असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
पुण्यात चाचण्यांची क्षमता कमी आहे, त्यात वाढ करण्याची गरज आहे. आकडे कमी करण्याच्या नादात रणनीती चुकायला नको. पुणे महापालिकेने आजवर कोरोना प्रतिबंधासाठी सुमारे 150 कोटी रूपये खर्च केले आहेत. राज्य सरकारने या परिस्थितीमध्ये महापालिकांना मदत केली पाहिजे, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केले.