शिवसेना भवनात दसरा मेळावा पूर्व तयारीसाठी महत्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत रामदास कदम यांच्या चिरंजीवाचे युवासेनेच्या कोअर कमिटीत अद्याप नाव असल्याने वरूण सरदेसाई यांना जाब विचारण्यात आला, यामुळे काही काळ वातावरण तापले होते.
याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसा आहे..? असा प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. त्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्तं करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारला..? यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले.
सध्या रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम शिवसेना शिंदे गटात असून ते दररोज शिवसेना ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. अशा प्रसंगी रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत. त्यांची हाकालपट्टी अजून का केली नाही..? असे प्रश्नं विभाग प्रमुखांनी विचारून युवासेनेच्या कार्यपद्धतीवर राग व्यक्तं केला असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.