मुंबई | विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद काेणाला मिळणार, असा प्रश्नही उपस्थित हाेत आहे. आता पालकमंत्रिपदाची माळ आमदार माधुरी मिसाळ यांच्या गळ्यात पडेल का, अशीही चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर रविवारी विधानसभेत झालेल्या भाषणात अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह खुद्द विधानसभा अध्यक्षही त्यातून सुटले नाहीत. त्यातच अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. ‘दादा, तुम्ही फार बाकडे वाजवू नका, तुमच्याच मंत्रिपदाबाबत अजून नक्की काही नाही,’ असे ते म्हणाले. तसे असेल तर पुण्याचा पालकमंत्री कोण? असा प्रश्न चर्चेत आला आहे.
मागील अडीच वर्षे पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडेच होते. ते स्वत:च पुणे जिल्ह्याचे असल्याने पुणे शहरासह जिल्ह्याकडे त्यांचे बारीक लक्ष होते. त्याआधी भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात बहुतांश काळ पुण्याचे पालकमंत्रिपद गिरीश बापट यांच्याकडे होते. ते खासदार झाल्यानंतर अखेरचे काही महिने चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर ते कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले. आता ते पुण्यातीलच आमदार असल्याने त्यांच्याकडेच पुण्याचे पालकमंत्रिपद असणार, अशी पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना खात्रीच आहे.