मुंबई | शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर ठाकरे सरकार जाऊन भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार सत्तेवर आले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सोमवारी विधानसभेमध्ये विश्वासमत जिंकत आपलं सरकार भक्कम असल्याचं दाखवलं आहे. तर दुसरीकडे
आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर तोफ डागली आहे.
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवमाणूस पण त्यांच्या भोवतीचे लोक त्यांना काहीच सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता, असा खळबळजनक दावा बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत यांच्यावरही गायकवाड यांनी टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत हेच राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले होते, असा खळबजनक आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.
राज्यात गेले अनेक दिवस सत्तासंघर्ष सुरु होता. काल शिंदे-फडणवीस सरकारनं बहुमत सिद्ध केलं आणि अखेर या नाट्यावर पडदा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह 21 जूनच्या रात्री बंड केलं होतं. त्यानंतर शिवसेनेतील एकापाठोपाठ एक आमदार शिंदे गटात सामील झाले आणि अखेर शिंदे गटानं भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं.
राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच आपल्या स्वगृही परतलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेतली आणि बंडाची कहाणी सर्वांसमोर मांडली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी बंड का केलं? का टोकाची भूमिका गाठली हे स्पष्ट केलं.