Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेसने स्वतःला सावरावं, देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज- संजय राऊत

0

मुंबई : गेले काही दिवस काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. गुलाम नवी आझाद, कपिल सिब्बल यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष निवडी संदर्भात सोनिया गांधींनी पत्र लिहिले होते. यावर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पत्राला भाजपची फूस असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केल्याच्या बातम्या देखील आल्या. मात्र काँग्रेसने यासर्व प्रकारचे खंडन करत असे काही घडलेच नसल्याची भूमिका मांडली आहे. सामानाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत याविषयी भाष्य केले आहे.

पत्रकारांनी यासंबंधी राऊत यांना विचारणा केली असता, ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे यावर मी भाष्य करणे योग्य नाही. मात्र काँग्रेस हा देशातील जुना आणि देशातील प्रमुख पक्ष आहे. स्वातंत्र्यलढ्यात या पक्षाचे मोठे योगदान आहे. अनेक प्रधानमंत्री या पक्षाने दिले आहेत. काही वरिष्ठ नेत्यांच्या विचारांमुळे राहुल गांधी यांना नेतृत्व करण्यात अडचणी येत आहेत. मात्र यावरती लवकरात लवकर मार्ग काढणे गरजेचे आहे. देशाला आज एका मजबूत विरोधी पक्षाची गरज असल्याचेही राऊत पुढे म्हणाले.

सामनाच्या अग्रलेखातून देखील ‘पत्र नेत्यांवर’ टीकेची झोड

याच काँग्रेस पक्षाने कित्येक नेते घडवले मुख्यमंत्री पदापर्यंत नेले. पक्षाचा हात नसेल तर यातले किती नेते पुढे येऊ शकले असते. पी. चिदंबरम यांनी देखील राजीव गांधींच्या विरोधात नवा पक्ष काढला परंतु लोकांनी त्यांना स्वीकारले नाहीत. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून शरद पवारांच्या मदतीशिवाय निवडून येता येत नाही. गुलाम नवी आझाद, कपिल सिब्बल, अहमद पटेल हे वरिष्ठ नेते असले तरी काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त यांचं अस्तित्व काय आहे.

राऊत पुढे म्हणतात, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी एकट्याने सर्व देश पिंजून काढला, संपूर्ण भाजपला एकट्याने अंगावर घेतले. भाजपने जेंव्हा राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून कंबरेखालचे हल्ले करण्यात आले प्रतिमा मलिन करण्यात आली तेंव्हा या ‘पत्र नेत्यांपैकी’ एकही नेता पुढे आला नाही.

आजाराने ग्रासलेल्या ७० वर्षांच्या सोनिया गांधींकडून हुतुतू आणि कब्बडी खेळण्याची अपेक्षा आहे का यांना, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता तेंव्हा यातला एकही माय का लाल नेतृत्व करण्यासाठी पुढे आला नाही. पक्षाचं काम करण्यापासून आणि पक्ष वाढवण्यापासून अडवलं होतं का ?

असे एक ना अनेक टीकेचे राऊंड राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून ‘पत्र नेत्यांवर’ चालवले.

Leave A Reply

Your email address will not be published.