शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्य मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर, इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले. नागपुरात, फडणवीसांच्या स्वागताला भाजप कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आता, शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. शुक्रवारी भेट होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या भेटीत मुख्यत्वे चर्चा होणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे 8 जुलैला रात्री 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
तसेच शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिल्लीत राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने पाठिंबा दिला म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत.