एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा रंगली. भावना गवळी या भाजपासोबत जातील अशी भिती शिवसेनेच्या गोटात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून काल दूर केले. या मुद्द्यावर आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.
“काल आम्ही संसदीय पक्षातर्फे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना पाठवलं आहे. पुढील अडीच वर्षांत अनेक निर्णय घेतले जाणार आहेत. अशा वेळी कामाला गती मिळायला हवी हे महत्त्वाचे आहे. भावना गवळी या उत्तम काम करत होत्या पण त्यांच्या काही कायदेशीर लढाया सुरू आहेत. त्यामुळे त्या दिल्लीत संसदेत काही वेळा येत नाहीत असं संजय राऊत म्हणाले
तसेच ते पुढे म्हणाले की, गवळी ह्या मधल्या काळात कायदेशीर पेचात सापडल्या होत्या. अशा वेळी मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) म्हणून व्यक्ती संसदेत हजर असायला हवी. कारण अशा वेळी चीफ व्हिपची फार गरज असते. पक्षाचे आदेश काढायचे असतात. त्यामुळे सगळ्यांशी बोलून उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार अमलबजावणी करण्यात आली आहे”, अशा शब्दांत राऊतांनी निर्णयामागचे कारण सांगितले.