शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद आणि टीका टिपण्णी दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे. तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे. सत्तांतरानंतर आमदारांकडून पुन्हा मातोश्रीवर जाण्याचे संकेत दिले जात आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंकडून आमदारांना गद्दारही म्हटलं जात असल्यानं शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकरयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आदित्य ठाकरे अद्याप ही आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंची भाषा शिकावी संजय राऊतांची भाषा शिकू नये, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना केसरकरांनी शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना दिला. दिपक केसरकर हे साईबाबांचे निस्सिम भक्त आहेत. गुवाहाटीला असतानादेखील त्यांनी तिथल्या साई मंदिरात जावून बाबांचे दर्शन घेतले होते. गुरुवारी रात्री केसरकर शिर्डीच्या साईबाबा मंदिरात पोहचले. नेहमी प्रमाणे साई समाधीचे दर्शन घेतले.
शिंदे गट आणि भाजपाच्यावतीनं साईचरणी लीन झाल्याचं सांगत उठावाला चांगलं यश आल्यानं साईबाबांचे आभार मानण्यासाठी शिर्डीत आल्याचं दिपक केसरकर यांनी सांगितलं. बाबांचा श्रद्धा आणि सबूरी मंत्र आमच्यासोबत होता त्यामुळे उठावाच्यावेळी आमच्या एका ही आमदाराने तोल ढळू दिला नाही. गैरसमज निर्माण केला जात होता मात्र त्याला समर्पक उत्तर देण्याची बुद्धी साईबाबांनी दिली असल्याचं केसरकर यांनी यावेळी म्हटलं.
‘हा’ शब्द भाजपकडून आधीच घेतला – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणत वादग्रस्त ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. हा एक कटू प्रसंग आहे. मात्र आम्ही आधीच भाजपकडून आमचे नेते उद्धव ठाकरे यांना कोणीही डिवचू नये, अपशब्द वापरु नये हा शब्द घेतला आहे. त्यावेळी भाजपचे सर्व आमदार, नेते, शिंदे गटाचे नेते, आमदार यांच्या समक्ष आम्ही शब्द घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आमची भावना समजून घेत बैठकीतील सर्वांना सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलणार नाही याची खात्री दिली होती. मात्र दुर्दैवानं त्या बैठकीला किरीट सोमय्या हजर नव्हते. तेव्हा लवकरचं उपमुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील. किरीट सोमय्यांच्या ट्विटमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर पक्षश्रेष्टी सोमय्यांना योग्य ती जाणीव करुन देतील, असं स्पष्ट मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केलं.
आदित्य ठाकरेंनी वडिलांची भाषा शिकावी आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. मी त्यांच्यापेक्षा दुपट्ट वयाचा आहे. मात्र आदित्य ठाकरे समोर आले तर मी स्वतः उठून उभा राहतो कारण ते बाळासाहेबांचे नातू आहेत. आदित्य यांना जो मान देतो तो बाळासाहेबांचा मान आहे.आदित्य ठाकरे जर बाळासाहेबांचे नातू असतील तर असा शब्द तोंडी येताना त्यांनी दहावेळा विचार करायला हवा. आम्ही खूप बोलू शकतो मात्र बोलणार नाही कारण बाळासाहेबांचा वारसा त्यांच्याकडे आला आहे. तेव्हा त्यांनी कसं बोलावं हे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं, संजय राऊत यांच्याकडून शिकू नये, असा सल्ला यावेळी केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.