स्वच्छ्ता ही लोकचळवळ झाली असून स्वच्छतेबाबतची आपल्या देशाविषयीची प्रतिमा बदलत आहे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
पुणे , ०१ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छतेच्या जागृकतेविषयी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत समाजातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी स्वच्छ भारतासाठी प्रचंड उत्साह दाखवला होता. यावेळेस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना मन की बातच्या 105 व्या भागात 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेसाठी 1 तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. याच आवाहनानुसार स्वच्छता हीच सेवा उपक्रमाअंतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला. यावेळी महापालिका परिसर, शनिवार वाडा, भिडे पूल आदी ठिकाणी स्वच्छता केली. स्वच्छ्ता ही लोकचळवळ झाली असून स्वच्छतेबाबतची आपल्या देशाविषयीची प्रतिमा बदलत आहे, असे प्रतिपादन मंत्री पाटील यांनी केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे अनेक विषयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना जोडून घेत त्याची लोकचळवळ निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. गेल्या साडेनऊ वर्षात सर्वसामान्यांना स्वच्छ्ता मोहिमेशी जोडत आपल्या देशाची स्वच्छतेबाबतची प्रतिमा बदलली आहे.
आज शहरात साडेतीनशे पेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेसाठी उपक्रम राबविण्यात आला. यात दीड लाखाहून अधिक लोक सहभागी झाले आहेत हे या अभियानाचे यश आहे. सर्व विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा, विविध संस्था, कारखाने, स्वयंसेवी संस्था यात सहभागी झाले असून लोकसहभागाचे मोठे यश अभियानाला लाभले आहे. यातूनच स्वच्छतेची सवय निर्माण होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.
‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित वॉकेथॉनमध्ये महापालिका परिसर, शनिवार वाडा, भिडे पूल आदी ठिकाणी पालकमंत्री यांनी सर्वांसोबत सहभागी होत स्वच्छता केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वच्छ्ता विषयक शपथ दिली तसेच स्वच्छ्ता कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. यावेळी पुणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त संदीप कदम यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी यासोबतच भाजपा कोथरुड मंडल दक्षिणेच्या वतीने म्हातोबानगर येथे आयोजित स्वच्छता उपक्रमात सहभागी होऊन श्रमदान केले.