”ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
पत्राचाळ प्रकरणामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून कोठडीत मुक्कामी आहे. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून भाजप आणि शिंदे गटावर अग्रलेखातून हल्लाबोल सुरूच आहे. ‘मुख्यमंत्री शिंदे म्हणजे काय विचित्र मनुष्यप्राणी आहे हे आता महाराष्ट्राला कळू लागले आहे. मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यातील काही विधाने गमतीची आहेत.
संभाजीनगरच्या मुक्कामी मुख्यमंत्री म्हणतात, ”ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका.” मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, ”राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. माझी विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका.” मुख्यमंत्र्यांना 40 आमदारांचे समर्थन आहे.
मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल. काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली.
‘शिंदे यांचे सचिव व इतर मित्रमंडळींच्या नाडय़ा ‘ईडी’ने आवळल्यावरच त्यांनी सध्याचा उठाव आणि ‘क्रांती’ केली हेच सत्य आहे. स्वतः मुख्यमंत्री म्हणजे चाळीस आमदारांचा सेनापतीच ‘ईडी’विरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला. शिंदे संभाजीनगरात म्हणाले, ‘राज्यात आम्ही नवीन सरकार बनवले आहे.’ शिंदे हे कोणत्या सरकारच्या बाबतीत बोलत आहेत? असा सवालही सेनेनं केला.