युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ठाकरे गट उद्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे. मुंबई मनपाच्या लांबत असलेल्या निवडणुका मुंबई मानपामध्ये जनतेच्या पैशाची सुरु असलेली उधळपट्टी या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या या मोर्चाला महायुती देखील प्रत्युत्तर देणार आहेत. ‘चोर मचाये शोर’चा नारा देत आदित्य ठाकरेंच्या मोर्चाला भाजप-शिवसेना आणि आरपीआय महायुती प्रत्युत्तर देणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या मोर्चा विरोधात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने रस्त्यावर उतरण्याची रणनिती आखली असून, या मोर्चात भाजपसोबत शिवसेना आणि आरपीआय देखील सहभागी होणार आहे. भाजपच्या नरिमन पॉईंट येथील प्रदेश कार्यालयातून शनिवारी या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाकरेंविरोधात महायुती रस्त्यावर उतरत शक्तिप्रदर्शन करणार आहे. मागील २५ वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भ्रष्टाचार केला त्याची पोलखोल महायुती या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे, असं भाजयुमोतर्फे सांगण्यात आलं आहे.
शिवसेना ठाकरे गट १ जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे करणार आहेत. या मोर्चाची घोषणा घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २० जून रोजी केली होती. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.