मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलच शाब्दिक युद्ध पेटले आहे. शरद पवार यांच्या पुढाकारानेच भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू झाली होती. पवारांनीच पुढाकार घेतला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी करून पवारांच्या अडचणी वाढवल्या.
तर दुसरीकडे यावर भस्य करताना पवार म्हणाले की, माझे सासरे क्रिकेटपटू होते. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. मलाही गुगली कशी टाकायची माहीत आहे. त्यामुळे मी गुगली टाकली. सिक्सर मारला आणि भाजपवाले क्लिन बोल्ड झाले, असं त्यांनी पत्रकार परिषदेत विधान केले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही धक्कादायक माहिती देत भाजपची विकेट घेतली आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी त्या काळातील घटना घडामोडींवर भाष्य केलं. तसेच शरद पवार यांची खेळी कशी बरोबर आहे हे सुद्धा सांगितलं. तसेच राज्यातील राष्ट्रपती राजवटीचीही आठवण करून दिली. शरद पवारांनी जे सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
राष्ट्रपती राजवट कशी निघेल याबाबत आम्ही चिंतेत होतो. आपण बहुमताचा आकडा सिद्ध केला तरी राज्यपाल बहुमत मानणार नाही. ते वेळकाढूपणा करतील. केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट काढणार नाही. ते झुलवत ठेवतील यावर आमच्या वारंवार चर्चा झाल्या. एका भल्या पहाटे राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. ही पवार यांची गुगली आणि सिक्सर दोन्ही होतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.