मुंबई |
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री शिंदे काल (२१ जुलै) दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. मुख्यमंत्री शिंदे वैयक्तिक कामासाठी दिल्लीला जाणार असल्याचं सांगितलं जात असलं तरी तिथे जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. परंतु त्यांच्या या दौऱ्यामागचं मुख्य कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अनपेक्षितपणे सामील झालेल्या अजित पवार गटामुळे आधीच शिंदे गटाचे आमदारांमध्ये चलबिचलता सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देखील मिळालं.
त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं म्हटलं जात आहे. हा विस्तार कधी होणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर अंतिम निर्णय होतो का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.