Latest Marathi News

BREAKING NEWS

इर्शाळवाडीमधील मुलांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली

0

मुंबई | इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला असून रात्री गाढ झोपेत असताना इर्शाळवाडीच्या नागरिकांवर निसर्ग कोपला. या घटनेमध्ये संपूर्ण गाव जमीनीखाली गाडलं गेलं या दुर्घटनेत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेक मुलांनी त्यांच्या पालकांना गमावले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत इर्शाळवाडीमधील मुलांचे पालकत्व स्वीकारले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत इर्शाळवाडीमधील मुलांच्या पालकत्वाबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत’.

‘शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

‘हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.