संभाजीनगर । उद्धव ठाकरे यांची साथ सोडून पुकारलेल्या बंडामुळे संभाजीनगरातली शिवसेनेतली दुही विकोपाला गेली असतानाच आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरात आता भारत राष्ट्र समिती पक्षाची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केलाय.
येणाऱ्या आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जातेय. गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरेंविरोधात आव्हान उभं केलं होतं. आता हर्षवर्धन जाधव यांचा बीआरएसमधील प्रवेश ही भाजपाची डोकेदुखी ठरू शकते.नांदेडमधील ज्येष्ठ शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्या बीआरएस प्रवेशाच्या चर्चा सुरु असतानाच थेट संभाजीनगरातच हा पक्षप्रवेश झाल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे.
आमदार हर्षवर्धन जाधव यांनी बीआरएस पक्षात नुकताच प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैदराबाद येथे जाऊन भारत राष्ट्र समिती पक्षात केला प्रवेश केल्याचं वृत्त आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजी नगर शहरात सभा घेणार असल्याचं सूतोवातही हर्षवर्धन जाधव यांनी केलंय. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांना चंद्रशेखर राव यांच्या पक्षात राज्याची मोठी जबाबदारी देण्यात येणार अशी चर्चा आहे. जाधव यांच्यामार्फत पक्षाचा विस्तार केला जाऊ शकतो.