Latest Marathi News

BREAKING NEWS

बुलढाण्यात उद्धव ठाकरे घेणार 26 नोव्हेंबरला शेतकरी मेळावा

0

शिंदे यांच्या बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता पक्षबांधणीसह आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागले आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालपासून (31 ऑक्टोबर) मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांना ठाकरेंनी सुरुवात केली आहे. यात आजी माजी खासदारांसह स्थानिक जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन ठाकरे शिंदे सरकारला घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरुन उद्धव ठाकरे शिंदे सरकारला घेरण्याची शक्यता आहे. विधानसभा अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरेंचा होणारा हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र पार पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. आगामी काळातील मित्र पक्षांसोबतच्या युतीबाबत या बैठकांनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. कारण सुरुवातीला जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, त्यानंतर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली होती. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यातूनही काही शेतकऱ्यांनी त्यांची पिकं वाचवली होती. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक हिरावून घेतलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.