नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात रोहिणीचे भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता यांनी आमच्याकडे कोरोनाची लस आहे असं सांगून सभागृहात सर्वांनाच चकित केले. ते पुढे बोलत म्हणाले, ‘आमच्याकडे लस आहे. १. मास्क २. सोशल डीस्टंसिंग 3.. हात धुणे’.
जनतेचा कोरोनापासून बचाव करता न आल्याने गुप्ता यांनी आम आदमी पार्टी सरकारला प्रश्न विचारले. गुप्ता म्हणाले, कोरोनापासून लोकांना वाचविण्यात दिल्ली सरकार अपयशी ठरले आहे. कोरोना सतत वाढत आहे. जुलैमध्ये दिल्ली सरकारने शस्त्रे सोडली होती, त्यानंतर केंद्र सरकारने १०,००० खाटांची व्यवस्था केली होती, रेल्वेचे डबे तयार करण्यात आले होते, परंतु प्रश्न आहे की दिल्ली सरकार संसर्ग रोखण्यासाठी कोणती पावले उचलत आहे? कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दहा दिवसांनंतर टेस्ट न करताच डिस्चार्ज दिला जात आहे. अशा रुग्णांकडे निगेटिव्ह असा रिपोर्ट नसतो यावर सरकारने खुलासा करावा असेही ते म्हणाले.
दिल्ली विधानसभा अधिवेशनात सभागृहाच्या कारवाई दरम्यान रीठाला येथील आपचे आमदार महेंद्र गोयल यांनी अचानक सभापतींच्या राजीनाम्याची मागणी केली. महेंद्र गोयल यांनी सभागृहात सांगितले की, मास्क न लावल्याबद्दल त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदविण्यात आली आहे.
आपचे आमदार महेंद्र गोयल म्हणाले, जर ही माझी चूक असेल तर मी शिक्षेस सामोरे जाण्यास तयार आहे. अन्यथा एसएचओना निलंबित केले जावे. माझ्या भागात आमली पदार्थांचा व्यवसाय चालू होता. ते थांबविण्यासाठी ते घटनास्थळी गेले. मी मास्क घातला होता. हे सीसीटीव्हीवर रेकॉर्ड आहे.