Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजप आणि मित्रपक्ष शिंदे गटाची ताकद संपवत आहेत, रोहित पवारांच सुचक विधान

0

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीला उद्देशून एक विधान केलं होतं. ‘नागालँडप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएबरोबर यावं. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकवेळा शरद पवारांचं कौतुक केलं आहे. पवारांनी एनडीएसोबत यावं’, असं आठवले म्हणाले होते. त्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी आठवलेंचं विधान हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

ते म्हणाले की, एकीकडे शिर्डीत रामदास आठवले निवडणुकीला उभे राहतील, अशी केवळ चर्चाच नाहीत तर त्यांनी स्वतःच तसं सांगितलं आहे. पण, आपण हे समजून घेतलं पाहिजे की, शिर्डी हा लोकसभेचा मतदार संघ शिंदे गटाकडे आहे. सदाशिव लोखंडे हे तिथले खासदार आहेत. परंतु या मतदार संघातून रामदास आठवले यांनी लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री मोर्चेबांधणी करत आहेत. यावरून असं दिसून येतंय की, शिंदे गटाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजप आणि मित्रपक्षांकडून केला जात आहे. आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याकडे न पाहता त्यांच्या कृतीकडे सर्वांनी पाहावं. कारण येत्या काळात भाजपा आणि मित्रपक्ष शिंदे गटाच्या खासदारांच्या जागांवर हक्क सांगताना दिसतील, अशा शब्दांत रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.