राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांनी रोखठोकपणे महाविकास आघाडीविरोधात भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. सत्तांतरनाट्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी आपापल्या मतदारसंघात परतलेल्या या आमदारांनी बंडखोरीमागचे कारण सांगताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाच प्रामुख्याने लक्ष्य केले.
संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला, असे या आमदारांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर संजय राऊत उरलीसुरली शिवसेना देखील संपवतील, असा दावाही बंडखोर आमदारांकडून करण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.