मुंबई | : बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत ठाकरेंसोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरांच्या बसमध्ये दिसून आले. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, त्यावेळी हेच संतोष बांगर ढसाढसा रडले होते.
संपूर्ण मराठवाड्यातले शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंसोबत जात होते, फक्त संतोष बांगर ठाकरेंसोबत उभे होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी ढसाढसा रडलेही होते. पण स्वतःला सच्चा शिवसैनिक म्हणवणारे बांगर अवघ्या 24 तासांत शिंदे सैनिक झाला. पण आता शिवसेना संतोष बांगर यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.
एकीकडे नव्या सरकारचं शक्तीप्रदर्शन सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या आमदारांबाबत कार्यकर्त्यांमधून काही ठिकाणी नाराजीही समोर आली आहे. बहुमत चाचणीआधी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे हिंगोलीतील शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.
बांगर यांच्या बंडखोरीचा शिवसेनेवर काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. तसंच शिवसेना बांगर यांना धक्का देण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष पदावरुन बांगर यांची हकालपट्टी होऊन नवा जिल्हाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. या बातमीला अद्याप दुजोरा माळेला नसून मात्र लवकरच बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे.