राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येते आणि तात्काळ ५० रुपयांची घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ होते यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला. घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये आज पुन्हा एकदा मोठी वाढ केली.
आजपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे एका सिलेंडरसाठी आता मुंबईत १०५२.५० रुपये मोजावे लागणार आहेत. देशातील चार मोठ्या शहरांचा विचार केल्यास दिल्लीमध्ये एका सिलेंडरसाठी १०५३ रुपये, कोलकातामध्ये १०७९ रुपये, तर चेन्नईमध्ये १०६८.५० रुपये मोजावे लागणार आहेत. याच मुद्द्यावरून महेश तपासे यांनी सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले.
राज्यात भाजपप्रणीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार येते. त्यानंतर लगेचच ५० रुपयांची घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ होते यावरुन जनतेने काय तो निष्कर्ष काढला पाहिजे, असे महेश तपासे म्हणाले. एकीकडे महाविकास आघाडीतील ५० आमदार फोडले आणि दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करताच भाजपा सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे.
आता याच काय अर्थ लावायचा तो जनतेनेच लावायला हवा. महाविकास आघाडीतील ५० आमदारांचे बंड आणि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर लगेचच केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये ५० रुपयांची दरवाढ केली आहे. दोन्हीकडे ५० हा आकडा काहीतरी संकेत देत आहे, अशी कोपरखळी महेश तपासे यांनी मारली.