मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता बंडखोरांसह अन्य नेते आपापल्या मतदारसंघात, गावी परतत असून, त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे.
तसेच विविध माध्यमातून गेल्या काही दिवसांतील सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर पुन्हा एकदा भाष्य केलेले आहे. आम्ही काहीही बेकायदा केलेले नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकांदरम्यानही विरोधकांनाच फटकारण्यात आले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजप नेतृत्वाचा निर्णय तुमच्यासाठीही धक्कादायक होता का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना, भाजप सत्तेसाठी काहीही करते, असा लोकांचा दृष्टीकोन होता. मात्र, आम्ही ५० आमदारांनी हिंदुत्वाची आणि विकासाची भूमिका घेतल्यानंतर भाजपने मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देत संपूर्ण देशवासियांना एक वेगळ्या प्रकारचा संदेश दिला आहे, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. एएनआय या वृत्तसंस्थेशी एकनाथ शिंदे बोलत होते.