गुवाहाटीला गेलेल्या शिवसेना आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांवर रविवारी झळकलं होतं. मात्र प्रत्यक्षात तिथं असं काहीही घडलं नसून हे वृत्त खोटं आहे, असा खुलासा बंडखोर आमदार प्रकाश अबिटकर यांनी केला आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे ४० आमदार हा सध्या पूर्ण देशभर चर्चेचा विषय आहे. अगोदर सूरतमध्ये असणाऱ्या या आमदारांच्या गटानं आपला मुक्काम हलवला असून सध्या गुवाहाटीतील एका अलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे.
गुवाहाटीत असणाऱ्या आमदारांमध्ये वादावादी होऊन हाणामारीला सुुरुवात झाल्याचा एक व्हिडिओ रविवारी दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यात एकजण हातात काही घेऊन तोडफोड करत असताना दिसत होतं. शिवसेनेच्या आमदारांमध्ये घडलेल्या या प्रकाराची चर्चा काही वृत्तवाहिन्यांनी सुरु केली होती.
अशातच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त दिसू लागलं होतं. त्यानंतर लगेचच बंडखोर गटाच्या वतीनं खुलासा करण्यात आला असून असा प्रकारचं कुठलंही कृत्य आमदारांकडून घढलेलं नसल्याचं जाहीर कऱण्यात आलं आहे. बंडखोर गटाचे नेते यांनी थेट आमदार प्रकाश अबिटकर यांचा व्हिडिओच ट्विट केला आहे.
या व्हिडिओत नेमकं काय घडलं याबाबत स्पष्टीकरण देणारा हा व्हिडिओ आहे. या हाणामारीत आमदार प्रकाश अबिटकर यांचा सहभाग असल्याचं वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरील बातमीत म्हणण्यात आलं होतं. मात्र हे वृत्त पूर्णतः चुकीचं आणि खोडसाळ असून असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं अबिटकर यांनी स्पष्ट केलं आहे. अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नये, असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे.