हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन आज बरीच वर्ष झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ राजकीय नाही तर सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी खूप काम केले, त्यांना मदत केली. बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपट सृष्टीशी असलेले नाते तर सर्वश्रुत आहे. आता चित्रपट म्हटले तर कलाकार ओघाने आलेच की. बाळासाहेब ठाकरे आणि सिनेसृष्टीतील कलाकार यांचे नाते सुद्धा खूपच सुंदर होते.
हिंदी, मराठी कोणत्याही चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारा कलाकार बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आदरानेच घ्यायचा. त्यांनी प्रत्येक कलाकाराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत केलीच होती. त्यामुळे कलाकारांसाठी बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही देवापेक्षा कमी नव्हते. त्यामुळेच त्यांना नेहमीच बाळासाहेबांना देवाइतकेच महत्व दिले.
नुकतीच बाळासाहेबांची ९७ वी जयंती झाली. या जयंतीच्या निमित्ताने बाळासाहेबांच्या चाहत्यांसोबतच कलाकारांनी देखील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी त्यांना अभिवादन केले. बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जाणाऱ्या अनिल कपूर यांनी देखील ट्विटरवर बाळासाहेबांचा फोटो ट्विट केला आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये फोटो शेअर करून लिहितात की, “जर निर्भीडतेला चेहेरा असता तर तो खरोखर बाळसाहेबांचा असता. ते खूप कमी नेत्यांपैकी एक होते, ज्यांची विनोदबुद्धी, नम्रता आणि ताकद पाहून मला खूप प्रेरणा मिळायची. ते अनेकदा मला फोन करायचे आणि विचारायचे, अनिल! तुझा नवा सिनेमा प्रदर्शित झाला आहे, अजून मला तो दाखवला नाहीस तू. मिस यु बाळसाहेब.”