Latest Marathi News

BREAKING NEWS

रेल्वेच्या २ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी

0


२ योजनांसाठी ६,४०५ कोटी खर्च करणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. या सरकारने रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वाधिक महत्व दिले. त्यातच आता आर्थिक प्रकरणाच्या मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रेल्वे मंत्रालयाच्या दोन महत्वपूर्ण योजनांना मंजुरी दिली. या दोन योजनांना एकूण ६,४०५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे रेल्वेच्या परिचालनात सुधारणा तर होईलच, शिवाय माल वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या क्षमतेत वाढ होणार आहे.


पहिली योजना झारखंड राज्यातील आहे. झारखंड येथील कोडरमा ते बरकाकाना दरम्यान १३३ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गिकेचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग झारखंड येथील प्रमुख कोळसा खाणीतून जात असून पाटणा तसेच राची दरम्यान सर्वात शॉर्टकट आहे. त्यामुळे हा मार्ग मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी कळीचा ठरणार आहे.


दुसरी योजना कर्नाटकच्या बेल्लारी ते चिकजाजूर दरम्यान १८५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाची आहे. ही रेल्वे मार्गिका कर्नाटकच्या बेल्लारी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यांसह आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून जाते. या परिसरात अनेक नैसर्गिक साधनसामुग्रीची उपलब्धता आहे. त्यामुळे हा मार्ग औद्योगिकदृष्ट्या खूपच उपयोगी मानला जात आहे. या मार्गावर १९ स्टेशन, २९ मोठे पूल आणि २३० छोट्या पुलांची उभारणी होणार आहे. तसेच ४७० गावांना आणि १३ लाख लोकांना कनेक्टिविटी मिळणार आहे.


‘पीएम-गती शक्ती
राष्ट्रीय मास्टर प्लॅन’

पीएम-गती शक्ती राष्ट्री मास्टर प्लॅन अंतर्गत बहु-मॉडेल कनेक्टिव्हिटी साकार करण्याच्या दिशेने उचललेले ठोस पाऊल आहे. झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील ७ जिल्ह्यांमधील सुमारे १,४०८ गावांना याचा फायदा होईल, ज्यांची एकूण लोकसंख्या सुमारे २८.१९ लाख आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे नेटवर्क ३१८ किमीने वाढेल, असे रेल्वे मंत्र्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.