Latest Marathi News

BREAKING NEWS

फडणवीस-राज ठाकरेंच्या भेटीने समीकरणे बदलणार?

0


मुंबई : प्रतिनिधी
वांद्रे परिसरातील ताज लँड अँड हॉटेल येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये भेट झाली. एवढेच नव्हे, तर या दोन नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अलिकडे दोन ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. तसे सकारात्मक पावलेही टाकली जात होती. परंतु आता फडणवीस आणि राज ठाकरे यांची बैठक झाल्याने दोन ठाकरे एकत्र येणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हे ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. कारण फडणवीस यांनी ऐनवेळी डाव टाकून राज ठाकरेंना सोबत घेण्याची योजना आखल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांची ही नवीन खेळी मुंबईच्या राजकीय पटलावर मोठा बदल घडवणारी ठरेल. ही प्रेशर टॅक्टीस आहे का? असा सवालही उभा ठाकला आहे. त्यामुळे जर ही चर्चा अनुकूल असेल तर त्याचा जबरी फायदा भाजपाला होईल हे वेगळे सांगायला नको तर मनसेलासुद्धा राजकीय लाभ पदरात पाडून घेता येईल, असा राजकीय तज्ज्ञांचा व्होरा आहे.

आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही गटाकडून त्याविषयी सकारात्मक विधाने, वक्तव्य करण्यात येत होती. सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका खिशात घालण्यासाठी सध्या भाजपा आणि शिवसेनेत जोरदार धुमश्चकी उडालेली आहे. त्यादृष्टीने दोन्ही ठाकरेंची युती ही भाजपासाठी डोकेदुखी ठरणारी होती.

मराठी माणूस हा मनसे आणि ठाकरे सेनेचा अजेंडा आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत हिंदी भाषिक, गुजराती, मासांहार हे मुद्दे वरचेवर वादाचे ठरत आहेत. त्यामुळे मराठी माणसावर परप्रांतियांची मुजोरी सातत्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा स्थानिक मराठी माणसांना नक्कीच सुखावणारी होती. येत्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही युती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखीच होती.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात आता संदेश नाही थेट बातमीच देऊ, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याने राज्याच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट ही नवीन समीकरण तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित होत आहे. या युतीच्या चर्चेला फडणवीस यांनी ब्रेक लावल्याचे म्हटले जात आहे तर फडणवीसांनी अचूक वेळ साध्यलाचा दावासुद्धा करण्यात येत आहे. या दोघांमध्ये नेमकी कशावर चर्चा झाली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. ही भेट उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे चेकमेट असल्याचे राजकीय पंडित दावा करत आहेत.

शिंदे गटाकडूनही ऑफर
एकीकडे फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीची चर्चा रंगलेली असतानाच आता शिवसेना शिंदे गटानेही थेट राज ठाकरे यांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. यावरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याची ऑफर दिली. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार, शिंदे गटासोबत जाणार की उद्धव ठाकरे गटासोबत जाणार? याची चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.