राज्यात नवे प्रकल्प आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू असतानाच केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळविण्याच्या आठ राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र माघारला आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यात मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाने बाजी मारली आहे.
बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्कनंतर ऊर्जा उपकरण निर्मिती झोनही त्यामुळे महाराष्ट्राच्या हातून गेला आहे. यासंदर्भात खुलासा करताना शिंदे फडणवीस सरकारने यासाठी आधीच्या महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवले आहे. वेदांत-फॉक्सकॉन, टाटा-एअरबस हे प्रकल्प गुजरातला गेल्याने आधीच शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत आहे.
बल्क ड्रग पार्क गेल्यावरूनही विरोधकांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यातच ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रयत्नशील होती. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि तेलंगणा ही आठ राज्ये प्रयत्नशील होती. महाराष्ट्राकडून एमआयडीसीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने या आठ राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांचे एका एजन्सीमार्फत मूल्यमापन केले. त्या मूल्यमापनात मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रस्तावाला सर्वांत जास्त गुण देण्यात आले. एजन्सीच्या शिफारशीनुसार मध्य प्रदेशच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारच्या प्रकल्प सुकाणू समितीने २२ ऑक्टोबर २०२२ रोजी मंजुरी दिली असून केंद्र सरकारने प्रकल्प मंजुरीचे पत्र दिले.