अमोल कोल्हे यांची अजित पवारांवर टीका;दादांचा दरारा सर्वच जाणतात: त्यांनी तो केंद्रात दाखवावा आणि कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी….
मुंबई : खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, दादांचा दरारा सर्वांना माहित आहे. त्यांनी तो दरारा केंद्रात दाखवावा आणि ठामपणे सांगावे की आमचा शेतकरी संकटात आहे कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवा अशी अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
ही गौरवाची बाब…
पुढे ते म्हणाले की, मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने मला आव्हान देणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. दादा मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी नेहमीच आदर राहील. त्यांचे हे असे विधान असेल तर भेटून मी त्यांची भूमिका समजून घेईन”, असे अमोल कोल्हे म्हणाले.शिरूर लोकसभा मतदारसंघात मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार असे अजित पवार यांनी म्हंटले होते. याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
मी 2019 मध्ये जिथे उभा होतो आजही तिथेच…
पुढे कोल्हे म्हणाले” अजितदादा हे मोठे नेते आहेत. मी 2019 मध्ये जिथे उभा होतो आजही 2023 मध्ये तिथेच उभा आहे. त्यांनी भूमिका बदलली. त्यांना कान धरण्याचा अधिकार होता मात्र सोबत होतो तेव्हाच त्यांनी माझे कान का धरले नाहीत?” असे अमोल कोल्हे म्हणाले. तसेच शिरूर मतदारसंघात दादांनी पाहणी केली. यासाठी मी त्यांचा आभारी आहे. नागरिकांसाठी हा उड्डाणपूल खुला करावा अशी मागणी 6 महिन्यांपूर्वीच दादांकडे केली होती. आता अपेक्षा आहे की, आज त्यांनी पाहणी केल्यानंतर नागरिकांच्या सोयीचा निर्णय घेतला जाईल”, असे मत देखील अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
शरद पवार गटाकडून शेतकरी आक्रोश मोर्चा
दरम्यान,शरद पवार गटाकडून शेतकरी आक्रोश मोर्चा उद्यापासून 3 दिवस 30 डिसेंबरपर्यंत राष्ट्रवादीच्या काढला जाणार आहे. याबाबत अमोल कोल्हे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरील 6 प्रमुख मागण्या असतील. कांदा प्रश्न हा सर्वात प्रमुख मुद्दा असेल. तर 30 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालायच्या परिसरात शरद पवार यांची सभा देखील होणार आहे. मविआ आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा होणार असल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ताकद दाखवण्याचा अधिकार
पुढे ते म्हणाले, “खासगीत झालेली चर्चा सार्वजनिक केली जात नाही. वरिष्ठ नेत्यांसोबत माझी खासगीत चर्चा झाली होती. त्यांनी ती सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने ती सार्वजनिक करणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ताकद दाखवण्याचा अधिकार असून निर्णय मात्र जनतेकडून घेतला जातो. शिरूर मतदारसंघातील जनतेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता” असल्याचे अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले आहे.