मुंबई |
तळोजा कारागृहात कर्नाळा बॅंक गैर व्यवहारात अटकेत असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कारागृहातून पत्र जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय राजकारणातून राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे.
पनवेलमध्ये राजकीय चर्चेला सुरुवात झाली. शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी हे राजीनामा पत्र खरं असल्याचे सांगत ही शेकाप कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी दुदैवी बाब असल्याचे यावेळी स्पष्ट केले. परंतु लवकरच विवेक पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी विनंती करणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.
विवेक पाटील हे शेकापमध्ये १९७९ पासून सक्रिय होते. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती तसेच चार वेळा विधानसभा सदस्य म्हणून ते निवडून आले होते. चार वर्षांपूर्वी विवेक पाटील यांच्यावर ते अध्यक्ष असलेल्या कर्नाळा बॅंकेत त्यांनी ५४८ कोटी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचा आरोप भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.