Latest Marathi News

BREAKING NEWS

हारा वही जो लढा नही’ : डॉ. मनोजकुमार शर्मा

0

‘हारा वही जो लढा नही’ असे स्वत:ला समजावत आपले संघर्षपूर्ण करियर यशस्वी करणाऱ्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. मनोजकुमार शर्मा यांची जीवनकथा जगण्याची उमेद संपलेल्या प्रत्येकाला व्टेल्थ फेल ही त्यांची बायोग्राफी स्फूर्ती देणारी अशीच आहे. पत्नी आयएफएस अधिकारी श्रध्दा जोशी-शर्मा यांच्या प्रेमाखातर बारावी नापास असा शिक्का बसलेले मनोजकुमार आयपीएस झाले. अकरावीपर्यंत कॉपी करुन पास झालेले मनोजकुमार बारावीला कॉपी करायला मिळाली नाही म्हणून फेल झाले. बारावी नापास हा ठपका घेवूनच आयपीएसपर्यंत मजल मारणाऱ्या डॉ. मनोजकुमार शर्मा यांचा जीवनपट आता सर्व संपले म्हणणाऱ्यांना दिशादायक असाच आहे. व्टेल्थ फेल या त्यांच्या जीवनपटावर चित्रपट येत आहे. विदू विनोद चोप्रा दिग्दर्शित व्टेल्थ फेल हा चित्रपट २७ ऑक्टोबरला वर्ल्डवाईड आणि हिंदीसह चार भाषांमध्ये रिलीज होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. समाजातील अडल्या नडल्यांना मै हूँ ना असे सांगत दिलासा देणाऱ्या या जिरबाज अधिकाऱ्याच्या जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्कंठा यानिमित्ताने ताणली आहे. ‘‘कौन कहता है आसमॉ में छेद नही होता, एक पत्थर तो दिल से उछालो यारो’’ या शब्दात खचल्या मानसिकतेला दिलासा देणारे डॉ. मनोजकुमार शर्मा यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर दिशादर्शक ठरेल.

व्टेल्थ फेल ही डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत प्रेरणादायक आणि रंजक कादंबरी मागील तीन वर्षापासून अमेझॉनवर पुस्तक विक्रीचे नवे उच्चांक करत आहे. कादंबरीचा नायक मनोज १२ वीमध्ये कॉपी करण्यात अपयशी ठरल्याने अपयशी ठरला आणि तिथूनच त्याच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होतो. वास्तविक घटना आणि पात्रांवर आधारित ही कादंबरी संघर्ष, प्रेम, अपयश आणि नागरी सेवांच्या कठीण परीक्षेच्या मार्गावरील यशाचा एक अस्सल कागदपत्रही आहे. ‘हारा वही जो लढा नही’ हे डॉ. शर्मा यांचे जीवनध्येय वाक्य आहे. तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे हे पुस्तक युवकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास मदतगार ठरेल, अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकर यांनी या पुस्तकाबाबत दिली आहे. ‘संपर्क, समर्पण आणि अनुशासन यांचा मिलाफ’ म्हणजे हे पुस्तक असल्याचे सचिन तेंडुलकर यांनी सांगितले आहे. ‘सफलता उन्ही के कंठ मे जयमाला पहनाती है, जीनमे साहस, स्विकार, संकल्प, और समर्पण समान अनुपात मे होते है यह उपन्यास इसी संतुलन की गाथा है’, अशी प्रतिक्रिया अभिनेता अशुतोष राणा यांनी नोंदविली आहे.

सुनिल गावस्कर म्हणतात, प्रख्यात फिल्म निर्देशक विशाल भारव्दाज म्हणतात, ‘मेहनत, मोहब्बत और जुनून की एक नायाब दास्तांन है यह किताब’. सुपर ३०चे व्यवस्थापक आनंद कुमार यांनी ‘अगर दुनिया का सबसे निराश व्यक्ती भी इस पुस्तक को पढ लेता तो उसमे एक नई ऊर्जा का संचार हो जाएगा’, असे गौरवोध्दगार काढले आहेत. ‘अर्थिक मानसिक संघर्ष का विश्वनिय दस्तवेज’ असल्याचे मनोज वाजपेयी म्हणतात. अतिशय प्रामाणिकपणे जीव ओतून काम करणारा अधिकारी म्हणून डॉ. मनोजकुमार शर्मा यांची ओळख आहे. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची आस्थेवाईक चौकशी करुन त्यांचे काम तडीस नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. कार्यालयातील शिपायाला सुध्दा मेरे भाई कैसे हो… असे म्हणत कामाची सुरुवात करणाऱ्या डॉ. शर्मा यांच्याबद्दल पोलीस दलात कमालीचा आदर आहे. ‘काम तो करनाही है फिर हसके क्यो नही’ असे सांगत काम करण्याची हातोथी असणाऱ्या डॉ. शर्मा यांच्या संघर्षपूर्ण जीवन तरुणाईला मार्गदर्शक आहे.

संतोष पाटील (पत्रकार – कोल्हापूर)

Leave A Reply

Your email address will not be published.