सोलापूर |
स्थापत्य अभियंता सहायकाने अज्ञात कारणावरून राहत्या घरी खोलीत असलेल्या पंख्याला वायरने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी (ता.5) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास रमेश काटकर (रा. विडी घरकुल, एमएससीबी कंम्पाउंडचे समोर, ता. उत्तर सोलापूर , जि. सोलापूर) हे बांधकाम विभागात गेल्या वर्षापासून नोकरीस आहे. ते सध्या स्थापत्य अभियंता सहाय्यक पदावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, मोहोळ येथील कार्यालयात कार्यरत होते. ते पत्नी व लहान मुलासह मोहोळ येथे वास्तव्यास होते.
दरम्यान त्यांची पत्नी माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी सुहास काटकर हे एकटेच होते. आज शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अज्ञात कारणावरून मोहोळ येथील भाड्याचे राहात्या घरी खोलीत असलेल्या पंख्याला वायरच्या सहायाने गळफास घेवून आत्महत्या केली.
याप्रकरणी रमेश श्रीधर काटकर यांनी दिलेल्या खबरीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मालती नागरे करीत आहेत. मृत सुहास काटकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन विवाहित बहीण, व एक मुलगा असा परिवार आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येची बातमी समजताच मोहोळ येथील बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी, व त्यांच्या मित्र परिवाराने शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.