“शिक्षण हे जीवनोपयोगी आणि समाजोपयोगी असायला हवं, त्यासाठी नॅक ऍक्रिडेशन हे महत्त्वाचं” – चंद्रकांत पाटील
मुंबई |
मुंबई विद्यापीठ येथे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपंन्न झाले. यावेळी राष्ट्रीय मूल्यांकनाची आवश्यकता तसेच व्यावसायाभिमुख आणि समाजोपयोगी शिक्षणाची गरज याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आपले विचार मांडले शिक्षण आणि शैक्षिणक गुणवत्ता हि देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजपयोगी शिक्षण दिले पाहिजे असेही मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, राज्यातील महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. नॅक मूल्यांकनासाठी महाविद्यालयाच्या काही अडचणी असल्यास शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल असेही ते म्हणाले. त्यांनी यावेळी आवाहन केले कि पालकांनी याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांनी नॅक मूल्यांकनामध्ये मागे राहू नये. हे मूल्यांकन ऐच्छिक नसून ती एक अनिवार्य गरज आहे , हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी तुम्हला जिथे त्रास होतो ते आम्हाला सांगा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यपक भरती प्रक्रियेवर भाष्य केले. ते म्हणाले कि, प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत असून २ हजार ८८ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. रोस्टर प्रक्रिया हि महत्वपूर्ण आहे. रोस्टर पूर्ण करून घ्यायला पर्याय नाही. रोस्टर प्रक्रिया पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही आढावा घेऊन ही प्रक्रिया राबविण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि, शिक्षण मातृभाषेत असावे याला अधिक महत्व आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा आग्रह धरण्यात येईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विखुरलेल्या उच्च व तंत्र शिक्षण संस्थांपासून बहुशाखीय विद्यापीठांची रचना हि काळाची गरज आहे. नवीन कोर्स ला महत्व देण्यात येईल. ज्यामुळे त्यांना नोकरी, व्यवसाय करणे सोपे होईल. आम्हाला संस्कृत भाषा आली पाहिजे, मराठी भाषा आली पाहिजे, गाण्याची कला आली पाहिजे. त्यासाठी काही शिक्षण हे देखील महत्वाचे आहे. नवीन शैक्षणिक बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा देऊन प्रगत अभ्यासक्रमाच्या साहाय्याने प्रशिक्षण, संशोधन आणि समुदायाप्रती प्रतिबद्धता हे शिक्षण संस्थांचे स्वरूप असले पाहिजे आणि त्यातून राष्ट्रविकास आणि विद्यार्थीहित नक्कीच जोपासले जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,नॅकचे चेअरमन भूषण पटवर्धन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अजय भामरे, रुसाचे निपुल विनायक, उच्च शिक्षण संचालक धनराज माने,प्र कुलगुरू दिगंबर शिर्के, कुलसचिव शैलेश देवळणकर, विभागप्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते.