मुंबई |
शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची तब्बल १०३ दिवसानंतर तुरूंगातून सुटका झाली. पीएमएलए कोर्टाने राऊतांचा जामीन मंजूर केला. दरम्यान, आज संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला, तुरुंगात राहणं फारच कठीण असतं, तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. असं संजय राऊत म्हणाले.
त्याचबरोबर लवकरच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा॒ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. संजय राऊत यांनी तब्बल तीन महिन्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत मोदी आणि शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील कौतुक केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषतः गरीबांना घर देण्यासंदर्भात आणि ‘म्हाडा’ला अधिकार देण्यासंदर्भात फडणवीस यांनी कौतुकास्पद निर्णय घेतले आहे. असं संजय राऊत म्हणाले.
मी तुरुंगात होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले होते कटुता थांबली पाहिजे. त्यामुळे फडणवीस यांना भेटलं तर गैर काय? असं सांगतानाच भाजपच्या विरोधात लढाई सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवतात, असं संजय राऊत म्हणाले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा कौतुकमिश्रीत सूर पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.