किल्ले प्रतापगड येथील अफजलखान कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले आहे. या कारवाईवरून भाजप नेते नितेश राणे यांनी आनंद व्यक्त केला असून ‘नाद करायचा नाही’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. “अफजलखान कबरीजवळ अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवले. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. नाद नाही करायचा.” असे ते ट्वीटमध्ये म्हणाले.
तसेच त्यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून प्रतापगडाच्या पायथ्य़ाशी अफजलखानाच्या कबरीजवळ जे अनधिकृत बांधकाम उभारण्यात आले आहे ते हटवण्यात यावे, अशी शिवप्रेमींची मागणी होती. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही कोणत्याही सरकारची कारवाई करण्याची हिंमत होत नव्हती.
पण आज महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे. या सरकारने आम्हा सर्व शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक क्षण अनुभवण्यास दिला आहे. याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळांचे आभार मानतो.” असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला होता. त्यानंतर प्रतापगडावरच अफजलखानाची कबर बांधण्यात आली. त्या कबरीच्या आवारात काही खोल्या उभारण्यात आल्या होत्या. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. त्यानंतर या अनधिकृत खोल्यांचे बांधकाम पाडण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते.