बार्शी |
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर, गेटवर, गेटच्या आतमध्ये भर दिवाळीत पाच जणांनी आदलीसारखी स्फोटके फोडली. ही घटना २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडली. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत: सोपल यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून याबाबत फिर्याद दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.
याप्रकरणात पेशा रणझुंजारे, नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोपल यांनी २३ ऑक्टोबर रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. पण, ता. ३ नोव्हेंबर रोजी स्वतः पोलिस ठाण्यात हजर राहून स्फोटके फोडणाऱ्यांच्या नावांसह फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत असे नमूद केले की, २३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान फटाक्यांचे मोठंमोठे आवाज होत असल्याने मी जागा झालो. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहिले असता पाच जण आदलीसारखी स्फोटके उडवत होते. बंगल्याच्या दिशेने तोंड करून गेटला तसेच सुरक्षा रक्षकाच्या खोलीला आडवी स्फोटके जाऊन फुटल्याने नुकसान झाले आहे, त्यातील एका इसमाने गेटमधून दोन स्फोटके आतमध्ये टाकली. एका स्फोटामुळे गवत जळाले आहे, तर एक स्फोटक झाडाला धडकून खाली पडून विझल्याचे दिसून येत आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.