मुंबई |
आर्थिक गुन्हे शाखेने भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी माधुरी जैन यांच्यासह दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी कंपनीला बुडवले असून कंपनी ३ बिलियन डॉलरने बुडीत निघाल्याचं ग्रोवर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना कंपनीत घेणे ही माझी चूक होती, असं त्यांनी मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
अश्नीर ग्रोवर पुढे म्हणाले की, मी भारत-पे सोडल्यापासून कंपनीची कुठल्याही मेट्रिक्समध्ये वाढ झालेली नाही. अनेकांनी कंपनीतून काढता पाय घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहेल समीर का निघून गेले? या प्रश्नाचं उत्तरही रजनिश यांनी दिलं पाहिजे. ग्रोवर यांच्यावर गंभीर गुन्ह्यांच्या आठ कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अश्नीर ग्रोव्हर आणि त्यांची पत्नी यांच्यावर फौजदारी खटले 409, 420, 467 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्नीर ग्रोवर पुढे म्हणाले की, मी अनेकदा आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीसाठी गेलेलो आहे. मी प्रामाणिक असल्यामुळे भीती वाटत नाही. गुन्हे शाखेत जातांना वकिलाशिवाय चौकशीला गेलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.