Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या दिल्या सूचना

0

पुणे |

पुणे महापालिकेतंर्गत चाललेल्या प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी आढावा घेतला. आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्ता, एकलव्य कॉलेज ते मुंबई-पुणे रस्ता, बालभारती ते पौड फाटा रस्ता, पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्त्यांचा आढावा घेतला. हे सर्व प्रकल्प जनतेच्या सोयीसाठीच राबवण्यात येत आहेत. त्यामुळे काही अडचणी, अडथळे असतील, तर ते सहमतीनं दूर करावे, अशी भूमिका मांडून महापालिका प्रशासनासह संबंधित सरकारी यंत्रणांनी समन्वयाने काम करावं, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी केल्या. तसेच त्यांनी पुणे महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकल्पांचा आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना देखील दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी भिडेवाड्यातील पहिल्या मुलींच्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा, पी.एम.सी. व स्वच्छ संस्थेचे मॉडेल, घनकचरा व्यवस्थापन, सिंहगड कॉलेज परिसर आणि आंबेगाव बु. येथील समस्यांबाबत बैठक, कोथरूड येथील गदिमा स्मारकाचे काम आदी कामांबाबतचा या बैठकीत आढावा घेतला.

एकलव्य कॉलेज ते पुणे मुंबई सेवा रस्ता १५ मी रुंदीचा आहे. या रस्त्याची लांबी शांतिबन चौक ते एकलव्य कॉलेज २५० मी व एकलव्य कॉलेज ते पुणे मुंबई सर्विस रस्त्यापर्यंत ३६० मी असा एकूण ६१० मी लांबीचा आहे. या लांबीपैकी एकूण विकसित झालेल्या रस्त्याची लांबी सुमारे ५४० एवढी आहे. विकसन न झालेल्या रस्त्याची बाधित मिळकत भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. हा रस्ता विकसित झाल्याने चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्यास तसेच या रस्त्याच्या परिसरातील नागरिकांना प्रमथेश सोसायटीतील खाजगी रस्ता न वापरता सदर रस्त्याच्या वापर करून पुणे मुंबई सेवा रस्त्यास जाणे सोयीचे होणार आहे.

बालभारती ते पौड फाटा या ३० मी रुंद विकास आराखड्यातील रस्त्या रस्त्याची एकूण लांबी सुमारे २.१० कि.मी. आहे. हा रस्ता विकसित झाल्याने लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणेस मदत होणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. पंचवटी ते पाषाण सुतारदरा रस्त्याच्या अनुषंगानेही यावेळी आढावा घेण्यात आला.

आंबेडकर चौक वारजे ते महात्मा कॉलनी रस्त्याअंतर्गत विकास योजनेच्या मान्य विकास आराखड्यानुसार आंबेडकर चौक ते गोपीनाथ नगर कोथरुड पर्यंत ३० मी. डी. पी. रस्त्यांची लांबी सुमारे १ हजार ८०० मी. इतकी आहे. या रस्त्याच्या सद्यस्थितीमध्ये डोंगर उतार व मोठ्या प्रमाणात पातळी कमी जास्त आहे. त्यामुळे नवीन विस्तृत प्रकल्प अहवाल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हा रस्ता झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. कोथरुड व कर्वेनगर भागातील प्रवासाचे अंतर कमी होवून कर्वेरस्ता (एन.डी.ए. रस्ता) रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.

यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, उपवसंरक्षक राहुल पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य अभियंता विजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.