शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत हे शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय गायकवाड यांनी राऊत यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केली होती. याचाच समाचार घेत संजय राऊत म्हणाले, हे गद्दार आमच्यासारख्या निष्ठावंतांना शिव्या देत असतील तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी रस्त्यावर येऊन शिव्या दिल्या पाहिजेत. हा आमच्या निष्ठेचा विषय आहे. त्यांना शिव्या देण्याची एवढी हौस असेल, तर महाराष्ट्रात शिव्या देण्यासारखे अनेक प्रकरण घडत आहेत. त्यांनी रस्त्यावर येऊन शिव्या दिल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू असताना त्यांनी किती लोकांना शिव्या दिल्या? असा प्रश्नच यावेळी राऊतांनी उपस्थित केला.
दरम्यान, शिवरायांचा अपमान सुरू आहे. त्यांनी अपमान करणाऱ्यांना शिव्या द्याव्यात ना. त्यांना ही संधी मिळाली आहे, तर त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना शिवी द्यावी. त्यांना शिवी देण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? असा प्रश्न राऊतांनी शिंदे गटाला विचारला. तसेच पुढे राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसत आहेत. ते रोज महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत. त्या कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना शिवी देता का? ते त्यांना कधीच शिवी देणार नाहीत, ते फक्त शिवसैनिकांना, निष्ठावंतांनाच शिव्या देत आहेत. त्यांनी जरूर शिव्या द्याव्यात. त्यांच्या शिव्या ऐकण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. काय सुरू आहे हे महाराष्ट्रालाही कळत आहे. तिथे ते शेपट्या घालत आहेत आणि इथे मात्र आम्हाला शिव्या घालत आहेत. त्यांच्या शिव्यांचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. ते वेडे झाले आहेत. वेडा माणूस शिव्याच देतो, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.