नवरात्री निमित्त सुरू केलेल्या या लेखमालेला दिवसेंदिवस मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून मी खरोखर खूप कृतार्थ झाली आहे आणि या लेखांचा अनेकांना खूप फायदा होतो आहे हे बघून आणि सर्व प्रतिक्रिया वाचून मला खूप समाधान वाटते आहे
नवरात्री निमित्त सुरू केलेल्या या लेखमालेला दिवसेंदिवस मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून मी खरोखर खूप कृतार्थ झाली आहे आणि या लेखांचा अनेकांना खूप फायदा होतो आहे हे बघून आणि सर्व प्रतिक्रिया वाचून मला खूप समाधान वाटते आहे
नमस्कार. नवरात्री निमित्त सुरू केलेल्या या लेखमालेला दिवसेंदिवस मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून मी खरोखर खूप कृतार्थ झाली आहे आणि या लेखांचा अनेकांना खूप फायदा होतो आहे हे बघून आणि सर्व प्रतिक्रिया वाचून मला खूप समाधान वाटते आहे.
आजचा वयोगट हा देखील तरुण वयोगट आहे. काल जसे आपण विवाहपूर्व समुपदेशन आणि तारुण्यातील आरोग्याची काळजी याविषयी माहिती घेतली त्याप्रमाणे आज आपण विवाहानंतर परंतु गर्भधारणेपूर्वी मुलींनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि काय काय केले पाहिजे हे थोडक्यात पाहणार आहोत.
१) “सुप्रजाजनन” आयुर्वेदामध्ये नमूद केलेली अतिशय विशाल कल्पना आहे. ‘सुप्रजा’ म्हणजे चांगली प्रजा आणि ‘जनन’ म्हणजे त्यांची निर्मिती आणि वाढ यासाठी सर्वतोपरी काळजी घेणे ही पती आणि पत्नी दोघांची देखील जबाबदारी आहे. मूल जन्माला घालणं म्हणजे केवळ एक सजीव दुसऱ्या जीवा पासून निर्माण होणे असा अर्थ नसून मनुष्य प्रजाती साठी ही अत्यंत जागरूकपणे पार पाडण्याची जबाबदारी आहे. या जबाबदारीची सुरुवात गर्भधारणेच्या आधीपासूनच होते.
२) माती जितकी सुपीक तितके त्यामध्ये रोवले गेलेले बीज तरारून वाढते. त्याचप्रमाणे पती आणि पत्नीचे बीज जर उत्कृष्ट असतील तर होणारी संतती सुद्धा उत्कृष्टच जन्माला येते. गर्भधारणे साठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. प्रत्येक स्त्रीला तिला हवी तेव्हाच गर्भधारणा झाली पाहिजे हे जरी बरोबर असेल आणि हा तिचा मूलभूत हक्क जरी असेल तरीदेखील हा निर्णय घेण्यासाठी योग्य ते ज्ञान तिच्याकडे असणे आवश्यक आहे.
३) कालच्या लेखात सांगितल्याप्रमाणे योग्य वयात Rubella vaccine, HPV मुळे cervical cancer होऊ नये म्हणून घ्यावयाचे vaccine, pneumococcal vaccine, Hepatitis B vaccine यासारखे सर्व vaccine गर्भधारणा होण्याआधीच घेणे श्रेयस्कर आहे. आणि आता त्यामध्ये covid साठी घ्यावयाच्या vaccine ची भर पडलेली आहे. तसेच काल च्या लेखांमध्ये सुचवलेल्या रक्ताच्या सर्व तपासण्या देखील गर्भधारणेपूर्वी करून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारची गर्भ निरोधक साधने वापरली जात असतील तर त्याचा वापर देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बंद करावा. Specially hormonal pills मनानेच बंद करू नयेत.
४) शारीरिक आरोग्य यामध्ये गर्भधारणेसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रीचे वय. गर्भधारणा, त्यानंतर नऊ महिने शरीरामध्ये होणारे बदल आणि त्यानंतर येणाऱ्या प्रसूती कळा आणि त्याच्यानंतर येणारी मातृत्वाची सर्वात सुंदर आणि सर्वात मोठी जबाबदारी या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी स्त्रीचे गर्भाशय, शरीर आणि मन सक्षम असायला हवे. काल सांगितल्याप्रमाणे वय वर्ष 21 ते 30 हा काळ गर्भधारणेसाठी सर्वात योग्य काळ आहे. वाढत जाणाऱ्या वयानुसार गरोदर पणात माता आणि बालक या दोघांना सुद्धा होऊ शकणाऱ्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये लक्षणीय वाढ होते. त्यामुळे लग्न झालेल्या मुलींनी वयाचा विचार करून मगच कुटुंब नियोजन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग व्यवस्थित केले पाहिजे. तीस वर्षानंतर गर्भधारणा होणार्या मातांमध्ये गर्भधारणेसाठी खूप उशीर होणे, वारंवार गर्भपात होणे, रक्तदाब वाढणे, त्यामुळे डिलिव्हरी दरम्यान होणारा रक्तस्त्राव वाढणे, रक्तातील साखर वाढणे यासारखे अनेक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. तसेच जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये शारीरिक व्यंग असण्याची, जनुकीय विकृतींची शक्यता सुद्धा वाढते. विवाहानंतर जन्मास येणारी संतती वंशसातत्य टिकविते म्हणून पूर्ण कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यामुळेच गर्भधारणेतील प्रत्येक पायरी खूप महत्त्वाची आहे.
५) मी आयुर्वेदाची डॉक्टर नाही परंतु मला ठाऊक असलेले अनेक उत्कृष्ट आयुर्वेदिक वैद्य अजूनही “गर्भाधान संस्कार” यासारखे अत्युच्च प्रतीचे संस्कार त्यांच्या कडे येणाऱ्या पालकांसाठी व्यवस्थितपणे पार पडतात. आणि त्याचे खूप खूप छान परिणाम बघायला मिळतात. गर्भाधान संस्कार म्हणजे थोडक्यात सांगायचे तर “कोणताही जीव गर्भात प्रवेश करताना तो आत्मा सुसंस्कारीत हवा; आणि त्याला आवाहन करण्याची पात्रता पती-पत्नींच्या अंगी यावी म्हणून आहार, विहार, विचार, शारीरिक स्वास्थ्य आणि आजूबाजूच्या परिसराचे शुद्धीकरण या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. याविषयी सध्या मी एवढेच सांगू शकते.
६) आज-काल करिअर मुळे मानसिक तणाव या बरोबरच स्मोकिंग आणि ड्रिंकिंग सारख्या व्यसनांचे प्रमाण सुद्धा महानगरांमधील आणि कित्येक शहरांमधील मुलींमध्ये वाढत चालले आहे. व्यसन ही वाईटच गोष्ट आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु वैचारिक आणि आर्थिक पुढारले पण दाखवण्यासाठी किंवा चारचौघांमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी जर आपण कॅज्युअल ड्रिंकिंग, पार्टी ड्रिंकिंग, ऑफिस मॅनर्स या नावाखाली कोणत्याही प्रकारचे मादक द्रव्य किंवा शरीराला घातक असलेले केमिकल्स आनंदाने डोळे झाकून घेत असू तर आपल्या शरीराबरोबरच येणाऱ्या बाळाच्या शरीरावर देखील आपण प्रचंड अन्याय करतो. त्यामुळे गर्भधारणेचा विचार करणाऱ्या सर्व मुलींनी शक्यतो आयुष्यभरासाठी आणि शक्य नसेल तर गर्भधारणेपूर्वी निदान तीन ते सहा महिने आधीच कोणत्याही प्रकारचे व्यसन बंद करावे. केवळ शहरांमध्येच नाही तर खेडेगावांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांमध्ये सुद्धा तंबाखू,बिडी, सुपारी, मिश्री यासारख्या पदार्थांचे व्यसन सर्रास दिसून येते हेसुद्धा गर्भासाठी घातक असते. आणि सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे यापैकी कोणीही मान्य करायला तयार नसते की याला व्यसन म्हणतात.
७) आदर्श आहार म्हणजे असा आहार ज्यामधून शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व खनिजे, प्रथिने, जीवनसत्वे, कर्बोदके योग्य त्या प्रमाणात पुरवली जावी. आज काल कीटकनाशकांच्या नको तेवढा माऱ्यामुळे आणि अस्वच्छता आणि रोगराई यांच्यामुळे शुद्ध भाजीपाला आणि धान्याच्या नावाने आनंदीआनंदच आहे. परंतु त्यात देखील काळजीपूर्वक ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेले धान्य फळे आणि भाज्या यांचा आपल्या आहारात समावेश करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. या ऋतूमध्ये आपल्या राहत्या परिसरात जे जे काही पिकतं ते ते सर्व आपल्या शरीरासाठी योग्य आणि चांगले असते त्यामुळे त्याचा आपल्या आहारामध्ये आवर्जून समावेश करावा. गर्भधारणेसाठी जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा आहारामध्ये भिजवलेले बदाम, काजू ,खजूर, खारीक, यासारखे ड्रायफ्रुट्स तसेच केशर, आणि दूध, राजगिरा, शेवगा यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि प्रत्येक ऋतूमध्ये मिळणारी सर्व फळे यांचा समावेश वाढवावा. मांसाहार, अंडी शक्यतो टाळावेत.चॉकलेट, मैद्याचे पदार्थ, चहा आणि कॉफी बंदच करावेत. तिखट, तेलकट, अति मसालेदार पदार्थ टाळावेत. बाहेरचे जेवण पूर्णपणे बंद करावे. घरामध्ये स्वतः किंवा घरातील व्यक्तींनी बनवलेले स्वच्छ ताजे जेवण कधीही चांगले. अती खाणे आणि अती उपवास या दोन्ही गोष्टी करू नयेत. Packed food किंवा preservative असलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत. खाण्या मधून आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा मिळाली पाहिजे याचे भान ठेवावे.
८) गर्भधारणेपूर्वी आपल्या दैनंदिनी मध्ये व्यायाम नियमितपणे असला पाहिजे. जेवढा नियमित व्यायाम करण्याची शरीराला सवय असेल तेवढी गर्भावस्था आणि प्रसूतीदरम्यान सोसाव्या लागणाऱ्या कळा दोन्ही खूप सहज आणि सुखकर पार पडतात. व्यायामाची सवय असलेल्या शरीराला दिवसा माजी वाढणाऱ्या बाळाला सामावून घेणे सोपे जाते. तसेच गरोदरपणामध्ये दररोज शरीराच्या प्रत्येक संस्थेमध्ये होणारे बदल स्वीकारणे देखील सोपे जाते. याच बरोबर प्रसूती दरम्यान ज्या स्नायूंचा (muscle and ligaments) वापर महत्त्वाचा असतो ते स्नायू देखील सक्षम राहतात. काहीही शक्य नसल्यास स्वतः च्या घरात रोज कमीत कमी दहा ते पंधरा सूर्यनमस्कार तर प्रत्येक मुलीला शक्य होतीलच.
९) जर काही मुलींना किंवा स्त्रियांना लहानपणापासून किंवा अनेक वर्षापासून काही विशिष्ट आजारांसाठी वेगळ्या प्रकारची औषधे कायमस्वरूपी किंवा तात्पुरती चालू असतील तर गर्भधारणे आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक औषधे गोळ्या यामध्ये असणारे केमिकल्स गर्भासाठी धोकादायक असून ते गर्भामध्ये व्यंग निर्माण करू शकतात. तसेच गर्भधारणा जेव्हा तुम्ही प्लॅन करता तेव्हा कोणत्याही प्रकारचे अँटिबायोटिक्स किंवा पेन-किलर्स यांचे मनाने सेवन करू नये. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असताना जर आजारी पडलात तर डॉक्टरांना याची कल्पना नक्की द्या म्हणजे त्याप्रमाणे डॉक्टर देखील अँटिबायोटिक्स आणि इतर औषधे लक्षपूर्वक देऊ शकतील. ही बाब पतीसाठी सुद्धा थोड्याफार प्रमाणात लागू होते. तसेच आहाराच्या बाबतीत संतुलन पाळणे ज्यांच्याकडून शक्य होत नसेल त्यांनी “डॉक्टरांच्या सल्ल्याने” फॉलिक ऍसिड असलेल्या सप्लिमेंटरी गोळ्या तीन ते सहा महिने पूर्वीपासून खाण्यासाठी सुरुवात करावी.
१०) कित्येकदा पती आणि पत्नी यापैकी एकाच्या किंवा दोघांचाही कुटुंबामध्ये काही अनुवंशिक रोग असतात. कधी-कधी ते स्वतः या रोगाचे पीडित असतात किंवा कधीकधी ते केवळ त्या रोगाचे वाहक असतात. अशावेळी हे अनुवंशिक रोग पुढच्या पिढीमध्ये उतरण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी पती-पत्नी दोघांनी देखील डॉक्टरांकडे जाऊन योग्यता तपासण्या करून याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.(अशा आजारांची कॉमन उदाहरणे म्हणजे थॅलेसेमिया, हिमोफिलिया.)
तसेच कित्येक वेळा रूबेला म्हणजेच एक प्रकारचा गोवर किंवा तसेच टॉक्सोप्लाझ्मा, CMV, Herpes यासारखे इन्फेक्शन गरोदर पणा मध्ये गर्भपात होण्यास किंवा बाळामध्ये व्यंग येण्यास कारणीभूत ठरतात. यांचीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज वाटत असल्यास आधी तपासणी करून मग गर्भ धारणेचा विचार करावा. तसेच पती आणि पत्नी या दोघांचाही रक्तगट माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये जर पत्नीचा रक्तगट आरएच निगेटिव्ह असेल आणि पतीचा आरएच पॉझिटिव असेल तर होणाऱ्या बाळाचा रक्तगट पुन्हा पॉझिटिव्ह असेल तर आई आणि बाळाचे रक्त मिसळून बाळाला अति प्रमाणात कावीळ आणि त्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. अशावेळी अँटी डी सारखे इंजेक्शन घेऊन हे सर्व टाळता येऊ शकते. आणि पुढील गरोदर पणामध्ये देखील होणारा धोका टळतो.
११) सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक स्वास्थ्य. केवळ आईच नव्हे तर वडिलांचे देखील मानसिक स्वास्थ्य या काळामध्ये प्रचंड चांगले आणि सकारात्मक असणे गरजेचे आहे. मानसिक संतुलन योग्य असेल तर हॉर्मोनल लेव्हल देखील आपोआप व्यवस्थित आणि अपेक्षेप्रमाणे राहतात. मानसिक ताणतणाव हे हार्मोनल imbalance चे सर्वात प्रमुख कारण आहे. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी नियमितपणे ध्यान धारणा करणे आवश्यक आहे. यामध्ये देखील हे विशेष सांगेन की आपल्या शरीरातील सप्त चक्रांपैकी “मूलाधार चक्र” हे गर्भ पिशवी जवळ स्थित आहे. ध्यान करताना ही गोष्ट लक्षात घेऊन जर मूलाधार चक्रावर आपले ध्यान केंद्रित केले तर त्याचा प्रचंड फायदा होतो. मात्र याविषयी शास्त्रशुद्ध ज्ञान या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून घेणे आवश्यक आहे. याशिवाय चांगले विचार ऐकणे, चांगले संगीत ऐकणे, चांगले वाचन करणे या सर्व गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जेवढे एका झाडाच्या वाढीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश, भरपूर पाणी आणि खेळती हवा.
वरील सर्व गोष्टी लक्षात ठेवून मगच आपल्या गर्भधारणेचा विचार आजच्या तरुण मुला मुलींनी करावा.आपल्या पोटी एक सुंदर निरोगी सुदृढ बालक जन्माला येईल आणि आई होण्याचे खरे सुख आणि समाधान आपल्याला लाभेल जे चिरंतन टिकणारे असेल.
धन्यवाद.
©️डॉ. गौरी कैवल्य गायकवाड.
Ob-Gyn
बार्शी.