Latest Marathi News

BREAKING NEWS

जी-२० बैठकांच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचविण्याची आपल्याला योग्य संधी आहे – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रभावशाली धोरणांमुळे, पर्यावरणाप्रति असलेल्या दूरदृष्टीमुळे G-20 च्या अध्यक्षपदाचा मान भारताला मिळाला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या बोधवाक्याला अनुसरून देशभरात विविध विषयांवरील बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे. देशांच्या विविध समितींच्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान, व्यापार सहकार्य, पर्यावरण, हरित ऊर्जा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील देवाणघेवाण आदी विविध विषयांच्या देशभरात २०० बैठका होणार आहेत. त्यापैकी २६ बैठका महाराष्ट्रात होणार असून त्यातील ३ पुण्यात होत आहेत, ही आपल्यासाठी भाग्य आणि अभिमानाची बाब असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुणे येथे १६ व १७ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या जी-२० बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पुण्यामध्ये होणाऱ्या G-20 बैठकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीच्या निमित्ताने पुण्याची प्रगती, क्षमता आणि संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी आहे. त्यामुळे याचं सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिले. हे आयोजन पुणेकरांसाठी गौरवाचा विषय असून पुणेकरांनी त्यात सहभागी व्हावं, असं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केले.

G-20 बैठकांमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या प्रवासाच्या मार्गावरील स्वच्छतेसोबत परिसर सुंदर दिसावा, सांस्कृतिक कार्यक्रमांत स्थानिक कलाप्रकारांचा समावेश करावा, महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, पुण्यातील शैक्षणिक-सांस्कृतिक समृद्धी प्रदर्शित करावी, सर्वसामान्य नागरिकांना तयारीत सहभागी करून घ्यावं आणि त्यांना या बैठकांच्या महत्त्वाविषयी माहिती द्यावी. विविध क्षेत्रातील नागरिकांना एकत्र करून त्यांच्यासमोर जी-२० बैठकीबाबत सादरीकरण करावं, असे निर्देशही चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

पुण्याचं ब्रँडिंग करण्यासाठी पर्यटन विभागातर्फे माहितीपट तयार करण्यात येत आहे. परदेशी प्रतिनिधींचं पारंपरिक वादनानं स्वागत होईल. महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव परदेशी पाहुण्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मर्दानी खेळ, पोवाडा, नृत्य आदी कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहेत. या वेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.