अभिनेता शाहरूख खान व दीपिका पादुकोणच्या ‘पठान’ या सिनेमाने रिलीजआधीच वाद ओढवून घेतला आहे. ‘पठान’ या चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं रिलीज झालं आणि देशातलं वातावरण तापलं. आता तर या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘पठान’ला बायकॉट करण्याची मागणीही सुरू झाली आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा व हिंदू संघटना आक्रमक झाल्या असताना दीपिकाची बाजू घेणारेही अनेकजण आहेत.
काल साऊथ स्टार प्रकाश राज यांनी दीपिकाची पाठराखण केली होती. आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दीपिकाची बाजू घेत देशातील राजकारण्यांवर निशाणा साधला आहे.अलीकडे मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘बेशरम रंग’ या गाण्यावर आक्षेप नोंदवला होता. या गाण्यातील सीन्स आणि कपडे बदलले नाहीत तर ‘पठान’ मध्यप्रदेशात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला होता. त्यांच्या या विधानावर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट केलं आहे.
हे आहेत आपल्या देशाचे सत्ताधारी नेते… अभिनेत्रींचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर काय माहित काही कामही करतील…, अशा आशयाचं ट्विट स्वराने केलं आहे. मात्र मागच्या प्रमाणे स्वरा यावरून ट्रोल होतेय. अनेकांनी या ट्विटनंतर तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
https://twitter.com/ReallySwara/status/1603378750111956992