जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे आणि लाखो अनुयायांच्या सहकार्यातून शिस्तबद्ध जयस्तंभ अभिवादन सोहळा संपन्न- चंद्रकांत पाटील
पुणे |
पुणे जिल्ह्यातील पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळा 1 जानेवारी 2023 रोजी उत्साहात झाला. जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे आणि अभिवादनासाठी आलेल्या लाखो अनुयायांच्या सहकार्यातून शिस्तबद्ध अभिवादन सोहळा संपन्न झाला. याबद्दल जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, आयोजनात सहकार्य करणाऱ्या विविध संस्था-संघटना, सर्व अनुयायी आणि स्थानिक ग्रामस्थांचं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनापासून अभिनंदन केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपण सर्वांनी एकजुटीने हा सोहळा यशस्वी केला. प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. महिलांचेही विशेष आभार मानतो. बंदोबस्तासाठी तैनात महिला पोलिस असोत किंवा आरोग्य कर्मचारी या सर्वांनी कर्तव्य आणि सेवाभावनेने आपापली जबाबदारी यशस्वी केली आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
पाटील यांनी पुढे म्हटले कि, आरोग्य, स्वच्छता विभागाचे कर्मचारी, पीएमपीएमएलचे सर्व चालक-वाहक, वाहतूक शाखा, पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे कर्मचारी अशा विविध विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही कर्तव्य चोख बजावलं. लाखो अनुयायी आणि स्थानिक ग्रामस्थांचंही उत्तम सहकार्य मिळालं. ग्रामस्थांनी स्वागताची परंपरा आणि संस्कृती छान जपली आहे. हा सोहळा उत्तम नियोजन, अनुयायांची शिस्त आणि सद्भावना, ग्रामस्थांचं प्रेम आणि सहकार्य, प्रशासनातील सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण म्हणून लक्षात राहील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.