जिजाऊंची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ओबीसी एकीकरण समितीचे पोलिसांना निवेदन
जिजाऊंची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ओबीसी एकीकरण समितीचे पोलिसांना निवेदन
ठाणे (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांची अश्लील शब्दात बदनामी करणार्यांवर गुन्हे दाखल करावेत; अन्यथा, ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ओबीसी एकीकरण समितीने ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर मा. आ. विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्युसंदर्भात बातमी सुरू होती. या बातमीमध्ये त्यांचा घातपात झाला असल्याचा उल्लेख येत असल्याने ही बातमी मी बारकाईने पहात असतानाच लाईव्ह चॅटमध्ये ” RSS!संघराज🚩 ” या नावाने अज्ञात इसमाकडून अत्यंत अश्लाघ्य आणि अश्लील शब्दात कमेंट करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे, मेघनाथ घरत, ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण , चर्मकार समाजाचे नेते अंकुश कारंडे,मराठा महासंघाचे संजय मिरगुडे यांनी पोलीस निरीक्षक रणवरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
ओबीसी एकीकरण समितीने दिलेल्या निवेदनानुसार, विनायक मेटे यांच्या संदर्भात बातमी सुरू असताना RSS!संघराज🚩 याने “पवारांचं निधन कधी होणार ? असा प्रश्न करीत पवार नामे इसमाच्या मृत्युसाठी प्रेरक भूमिका घेत असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर श्रीमंत कोकाटे आणि पवार यांनी खरा इतिहास लपवल्याचा आरोप केला. त्यानंतर या बातमीशी काहीही सबंध नसतानाही राजमाता जिजाऊ यांच्याबाबत अश्लील लिखाण केले आहे. RSS संघराज याने ” शिवाजी महाराज हे स्त्रियांसाठी हौशी होते म्हणून त्यांनी ६ पत्नी केल्या. आई जिजाऊ सुध्दा शहाजी राजे गेल्यानंतर त्यांचे ब्राह्मण सेवेकरी दादोजी कोंडदेव यांचेशी शारीरिक संबंध होते. हा इतिहास लपवल्या गेला””, असे लिखाण करून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी तर केली आहेच; शिवाय, राजमाता जिजाऊ यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले आहेत. त्यामुळे या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ नुसार तसेच भादंवि कलम ५०० ; कलम ५०५ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी, अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीने केली.